Health

बारकोड व क्यूआर कोडमध्ये माहिती कशी साठवली जाते?

बारकोडची संकल्पना सर्वप्रथम सुचली ती अमेरिकेच्या बर्नाड सिल्व्हर आणि नॉर्मन वूडलॅड या दोन सद्गृहस्थांना. हे दोघे समुद्रकिनारीत फिरत असताना वाळूवर ओढलेल्या रेघोट्यांतून(Morse code dots and dashes) जगाला या वेगवेगळ्या रुंदी असलेल्या समांतर रेषा मिळाल्या. जून १९७४मध्ये रिग्लेज च्युईंग गमच्या पाकिटावर प्रथम बारकोडचा वापर करण्यात आला. सुरुवातीला बारकोडचा वापर हा अन्न आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या सुपरमार्केटमधील वितरण व्यवस्थेसाठी करण्यात येत होता. पुढे ही प्रणाली वितरण व्यवस्थेसाठी सुलभ ठरू लागली आणि आजघडीला सगळीकडे वाण्याच्या दुकानातील हस्तलिखित पावतीची जागा या बारकोड ने घेतली आहे.

मॉल मध्ये किंवा संगणकीकृत बिलिंग व्यवस्था असलेल्या इतर ठिकाणी जेव्हा आपण खरेदी करतो तेव्हा बिलिंगच्या वेळी हा कोड एका उपकरणातून स्कॅन केला जातो. स्कॅन केल्यानंतर त्या वस्तूची किंमत आणि इतर माहिती संगणकाला मिळते. त्यामुळे कितीही मोठी यादी असली तरीही हा बारकोड स्कॅन करून संगणक एका झटक्यात त्या वस्तूंचे मूल्य आणि परिमाण याची सांगड घालून हिशोब आपल्यासमोर ठेवतो.

बारकोड म्हणजे उपकरणाद्वारे वाचता येईल अशा आकड्यांचा संच असतो जो कमी जास्त जाडीच्या समांतर रेषांच्या स्वरुपात लिहिलेला असतो. म्हणजेच आकड्यांचे असे रुपांतर की जे आपल्याला वाचता येणार नाही संगणकासारखे मशीन ते वाचू शकेल. काळ्या पांढऱ्या रेषांचा प्रत्येकी एक आकडा दर्शवणारा हा संच असतो. बारकोडमध्ये वस्तूबद्दलची माहिती जसे की वस्तूचे वजन, उत्पादनाची तारीख, उत्पादन क्रमांक, साखळी नंबर, बॅच नंबर ई. संकलित केलेली असते. यामुळे वितरण, साखळीतील वस्तूची ओळख व मार्गक्रमण यांचे जलद वाचन संगणकाला सुलभ होते. हा बारकोड दोन प्रकारचा असतो –

  • एकमितिय(१D- code) Barcode
  • द्विमितीय(२D- code) QR code

एकमितीय बारकोडचा उपयोग किराणा माल, कमी किमतीच्या वस्तू जसे की पेन, इलेक्ट्रोनिक गोष्टी इत्यादींवर केला जातो. द्विमितीय आणि एकमितीय बारकोड मध्ये फारसा फरक नसतो. त्यातला मुख्य फरक हा की दोघांना समान जागा लागत असेल तर एकमितीय पेक्षा द्विमितीय बारकोड मध्ये तुलनेने जास्त माहिती साठवता येऊ शकते.

बारकोड मध्ये वगवेगळ्या रुंदीच्या समांतर रेषा असतात. त्या समांतर रेषांमध्ये आणि त्यांच्या मधल्या जागेत आवश्यक ती माहिती साठवलेली असते. एका बारकोडला ९५ ब्लॉक असतात. त्या ९५ पैकी १२ ब्लॉकमध्ये बारकोड लिहिला जातो. त्यापैकी तीन ब्लॉक हे लेफ्ट गार्ड, सेंटर गार्ड आणि राईट गार्ड या नावाने ओळखले जातात.

बारकोड वाचण्यासाठी असणाऱ्या स्कॅनिंग मशीनमध्ये लेझर लाईटचा वापर केलेला असतो. हे मशीन डावीकडून उजवीकडे अशा क्रमाने बारकोड वरच्या रेषा वाचत जाते. हे मशीन वाचलेली रेषांच्या रूपातली माहिती बायनरी कोडमध्ये (0 or 1) रुपांतरीत करते. संगणक फक्त ही बायनरी रुपात असलेली माहिती वाचू शकतो. आणि हीच माहिती तो स्क्रीनवर दाखवतो. बार कोडच्या सुरूवातीचे पाच अंक निर्माता कंपन्यांचा आयडी क्रमांक असतो. पुढचे पाच अंक संबंधित उत्पादनाची संख्या.

क्यूआर कोडचा वापर सर्वप्रथम जपानच्या कंपन्यांतर्फे करण्यात आला होता. क्यूआर या इंग्रजी आद्याक्षरांचा अर्थ क्विक रिस्पॉन्स अर्थात त्वरित प्रतिसाद असा आहे.यात चौरस किंवा आयताकृती रचना असून त्यात द्विमितीय चिन्हे किंवा भूमितीय आकारांचा वापर केला जातो. संबंधित माहिती त्वरेनं वाचता यावी यासाठी या कोडची निर्मिती करण्यात आली. क्यूआर कोड हे बारकोडचं अपग्रेडेड व्हर्जन म्हणजेच आधुनिक आवृत्ती आहे. विशेष अथवा गुप्त माहिती सांकेतिक शब्दांत बदलण्यासाठी क्यूआर कोडचा उपयोग केला जातो.

बारकोड हा उत्पादनाच्या वितरण साखळीचा (उत्पादकापासून ते ग्राहकापर्यंत) अविभाज्य घटक झाला आहे. हे GS1 हे जागतिक अधिकृत मानक असल्यामुळे उत्पादकाला आपले उत्पादन जागतिक बाजारपेठेत विक्रीसाठी सहज उपलब्ध करून देता येते. बारकोडचे उत्पादकासाठी अनेकविध फायदे आहेत ते असे.

१. माहितीचे अचूक व जलद संकलन

२. उत्तम ट्रॅकिंग यंत्रणा (जगभरात कुठेही)

३. वेळेची बचत (वस्तूंची यादी करणे).

४. कमी मनुष्यबळ

५. कमीत कमी चुका, त्रुटी

आज वैद्यकीय सेवा, खाद्यपदार्थ, पुस्तके, कपडे, संरक्षण सामग्री, ऑटोमोबाईल अशा अनेकविध क्षेत्रांमध्ये बारकोडचा वापर केला जातो. आजकाल जागतिकीकरणामुळे जगभरातील विविध खाद्यपदार्थ आपल्याला सहज उपलब्ध होत आहेत.

अशा प्रकारे प्रत्येक बारकोड मधून संख्या आणि त्यामधून माहितीचे संकलन केले जाते. आणि ही माहिती संगणकीयकृत प्रणालीतून वापरली जाते.त्यामुळे मानवी श्रम कमी झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker