News

रामशेजच्या किल्ल्यावर मावळ्यांनी केलेला पराक्रम ऐकून थक्क व्हाल !

रामशेज हा किल्ला हा नाशिकच्या उत्तरेला १४ कि.मी. अंतरावर स्थित आहे. जुन्या काळातल्या नोंदीनुसार प्रभू श्रीराम या किल्ल्यावर विश्रांतीला जायचे आणि तिथे त्यांची शेज आहे म्हणूनच या किल्ल्याला “रामशेज” असे नाव मिळाले. जवळपास सह्याद्रीच्या रांगेतील बरेचसे किल्ले घनदाट जंगलात आहेत. दर्‍यांमध्ये वसलेले आहेत. पण रामशेज किल्ला एका सपाट आणि मोकळ्या मैदानावर आहे. किल्लाच्या जवळपास झाडी, जंगल सहसा क्वचितच आढळेल.

या किल्ल्याजवळचा एकमेव किल्ला आहे त्र्यंबकगड. आणि तो तब्बल ८ कोस अंतरावर आहे. हे पाहता हा किल्ला अगदी एकाकी पडल्याप्रमाणे होता; असं म्हटलं तरी चालेल. पण या किल्ल्याच्या ऐतिहासिक साक्ष म्हणजे साक्षात शौर्याची परिभाषा अगदी घट्ट आणि अधोरेखीत करून सोडणारी. तर आता हीच शौर्यगाथा तुम्हाला या लेखातून मी सांगणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाने महाराष्ट्र जिंकायचा पण बांधला होता. मोठ्या सैन्यबळानिशी तो इ.स. १६८२ ला महाराष्ट्रावर चाल करून आला.

आपल्या शहाबुद्दीन फिरोजजंग ह्या सरदाराला त्याने नाशिक प्रांतातील किल्ले काबीज करायची आज्ञा दिली. फिरोजजंगाने रामशेजपासून सुरुवात केली. किल्ल्यावर जे किल्लेदार होते. ते धाडसी, हट्टेकट्टे आणि पराक्रमी होते. ते रामशेजच्या तटावरून फिरत राहायचे. दिवसा आणि रात्रीही. ते कधी झोपायचे हेच कोणाला माहित नव्हते. किल्ल्यावर तोफा नव्हत्या. तरीदेखील किल्लेदाराने 500 ते 600 मावळ्यांच्या जोरावर फिरोजजंगची तब्बल 35,000 सैन्याची फौज दोन वर्षे लढवत ठेवून त्यांना माघार घेण्यास जेरीस आणले.

या किल्ल्याच्या खऱ्या शौर्याचं कसबं लागलं ते कासिम खानच्या आक्रमणाच्या तब्बल साडेपाच वर्षांच्या झुंजीत. कासिम खान ने रामशेज किल्ल्याभोवती एकदम कडेकोट पहारे लावले. किल्ल्यावर जाण्यासाठी थोडीसुद्धा वाट मोकळी ठेवली नाही. किल्ल्यावर दारुगोळा आणि अन्न धान्य पोहोचवण्याच्या सगळ्या वाट त्याने रोखून धरल्या होत्या. किल्ल्यापासून काही कोसावर संभाजी महाराजांनी पाठवलेले भोसले व मानाजी मोरे रसद घेऊन तयार होते. पण कासिमखानच्या कडक बंदोबस्तातून व कडेकोट पहाऱ्यातून गडावर रसद पोहोचवता येत नव्हती. किल्ल्यावरचे अन्न धान्य संपत आले होते.

गडावरील मावळ्यांवर वाईट दिवस आले होते, अन्नावाचून सगळ्यांचे हालहाल होत होते. ही परीस्थिती पाहता ४ ते ५ दिवसात किल्ला कासमखानच्या हातात जाईल अशी स्थिती आली. पण निसर्ग मराठ्यांच्या मदतीला धावून आला. जोरदार पावसाने हजेरी लावली नी किल्ल्याच्या एका बाजूला चिखल व पाण्यामुळे मेलेल्या जनावारचे मांस सडू लागले. त्यामुळे खूप दुर्गंधी पसरली. इतका घाण वास यायला लागला जो बिलकुल सहन होत नव्हता. त्या वासाने माणसे आणि जनावरे उलट्या करू लागले. मुघल सैनिकांना पहारा देणे खूपच अवघड होऊ लागले. मग कासिमखानाने त्या परिसरातला पहारा थोडा सैल केला.

एका दिवसासाठी तेथील सैनिकांना दुसरीकडे पहारा देण्यास सांगितले. त्याचा फायदा घेत किल्ल्यावर त्या एका दिवसरात्री रसद पुरवठा केला गेला. नी पुन्हा दिवसा किल्ल्यावरून मराठ्यांनी मुघलांवर मारा करायचा रपाटा सुरू केला आणि इकडे रात्री संभाजी राजांनी पाठवलेली फौजेची तुकडी मुघलांवर हल्ला करायची. हा किल्ला पुरेसा तटबंदी अथवा योग्य ढंगाचा जरी नव्हता तरी केवळ मुठभर 500 ते 600 मावळ्यांनी तब्बल हजारोंच्या फौजेला सतत 7 ते 8 वर्षे झुंजवत ठेवलं हे विशेषच मानावं लागेल. त्यामुळे हा किल्ला शौर्याची परिभाषा एका वेगळ्याच उच्चस्तरावर नेऊन ठेवतो, असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker