जेव्हा इरफान खान आणि ऋषी कपूर एकत्र आले होते.. फोटो होतोय व्हायरल

हरहुन्नरी कलाकार इरफान खान याच्या निधनाने बॉलिवूड चित्रपटसृष्टीला बसलेल्या धक्यातून बॉलिवूड अद्याप सावरलेले नाही तर गुरुवारी सकाळी ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी आली. या बातमीने संपूर्ण चित्रपटसृष्टीमध्ये शोककळा पसरली. अभिनेता इरफान खानच्या निधनाला २४ तासदेखील पूर्ण होत नाहीत, तर कलाविश्वातील ही दुसरी दु:खद बातमी समोर आली. इरफान खान आणि ऋषी कपूर यांचे चाहतेही शोक व्यक्त करत आहेत. त्यांच्या अनेक आठवणी शेअर करत आहे. अशातच इरफान खान आणि ऋषी कपूर यांचा ईद पार्टीमधील एक फोटोही सध्या चर्चेत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो अभिनेते जावेद जाफरी यांनी ईदच्या वेळी आयोजीत केलेल्या पार्टीमधील आहे. या पार्टीमध्ये इरफान खान आणि ऋषी कपूर यांनी हजेरी लावली होती. त्यावेळचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो बॉलिवूड फोटोग्राफर विरल भंयानीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
यापूर्वी त्या दोघांनी एकत्र काम केलल्या चित्रपटातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये दोघेही कारमध्ये मागच्या सीटवर बसलेले दिसत आहेत. इरफान खान आणि ऋषी कपूर सध्या एकाच प्रवासात असल्याचे जणू काही या फोटात दिसत असल्याचे चाहते म्हणत आहेत. मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यानेही हा फोटो शेअर करत म्हटले आहे की, “शांत प्रवास करा दोघंही. अगदी आरामात. आमची काळजी करू नका… आम्ही करू मॅनेज कसंतरी”.
शांत प्रवास करा दोघंही. अगदी आरामात. आमची काळजी करू नका… आम्ही करू manage कसंतरी. pic.twitter.com/nMCfXc8nsp
— सिद्धार्थ चांदेकर (@sidchandekar) April 30, 2020
ऋषी कपूर आणि इरफान खान यांनी निखील आडवाणी दिग्दर्शित ‘डी-डे’ चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात ऋषी कपूर यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमपासून प्रेरित भूमिका निभावली होती. तर इरफान खान चित्रपटात रॉ एजंट होते. या चित्रपटात अर्जून रामपाल, हुमा कुरेशी आणि श्रुती हसनदेखील प्रमुख भूमिकेत होते. इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या अशा अनेक आठवणी सोशल मीडियावर शेअऱ केल्या जात आहेत.